Thursday, 4 February 2010

संयुक्त महाराष्ट्र न्हवे ईस्ट इंडिया कंपनी...

लढाई विदर्भाच्या
अस्मितेची...
भाग ३

ब्रिटिशांच्या इस्ट इंडिया कंपनीने वसाहतवाद वाढवण्यासाठी भारतातला कच्चा माल कवडीमोल दरांत खरेदी करून विदेशात नेला. त्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या पक्क्या मालावर कर लावत तो भारतीयांच्या माथी मारला. स्थानिक लोकांना परावलंबी करणा-या ब्रिटिशांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या बाबतीत ६० वर्षांमध्ये हेच धोरण राबवले आहे. विदर्भाचा अनुशेष सातत्याने वाढत आहे, हे मान्य करणे या विधानातच याचे कारण दडले आहे.

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे अन्य भागातील शेतकरी स्वयंपूर्ण झाला नाही, हे आहे ६० वर्षांमध्ये विदर्भ- मराठवाड्याच्या वाट्याला आलेल्या करंटेपणाचे वास्तव. विकासाच्या मार्गाकडे नेणा-या व्हिजनचा अभाव हे त्यामागचे सर्वात मोठे कारण. मात्र हे दुर्दैवच आजवर विदर्भाच्या छाताडावर बसले.
इतरांच्या ताटातला घास ओढून घेत कोट्यवधींचा निधी लाटत प. महाराष्ट्राने योजना पळवल्या. पाण्यासारखा पैसा ओतून नाल्याची लायकी नसलेल्या ठिकाणी धरणे बांधून जमिनी पिकवल्या. ऊसाची लागवड वाढवून साखर कारखानदारी फोफावली. त्यामागे दस्तक देत आलेल्या सहकाराने राज्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या. याच नाड्या आता महाराष्ट्राचे भवितव्य ठरवायला निघाल्या आहेत.

विदर्भात पिकणा-या कापसाला पांढरे सोने म्हणतात. पण ते पिकवणारा शेतकरी मात्र काळा ठिक्कार का पडला हे कधी कोणी पाहिले नाही. कापड गिरण्यांचा विस्तार मुंबई, गुजरात, केरळ, तामिळनाडूत होत असताना जिथे हा कापूस पिकतो त्या भागात एकही कापड उद्योग नाही. कारण साखर कारखानदारीच्या धर्तिवर विदर्भात कापड उद्योग वाढावा असे, एकाही नेत्याला वाटले नाही आणि पटलेही नाही. त्यामुळे ज्या काही बोटावर मोजण्या इतपत सूत गिरण्या होत्या किंवा आहेत, त्या राजकारणाने पोखरल्या. नेत्यांना व्हिजन नसल्याने नागपुरातली मॉडर्न मिल बिल्डरांनी गिळंकृत केली. तिथे आज ऍडलॅब नावाने मल्टिप्लेक्स ऊभे आहे. अकोल्यातली मोहता मिलही कर्जात डुबली आहे.

विदर्भातल्या कापसापासून तयार झालेले कापड नुसते म्हणायला अख्खा महाराष्ट्र वापरतो, मात्र इथल्या शेतक-याच्या ढोपरावरल्या धोतराची ठिगळं कायम आहेत. याहून मोठे दुर्दैव काय असू शकते ? नाकर्तेपणाची झूल पांघरून बसलेल्या नेत्यांना जिथे याची चिडच येत नाही, तिथे विकासाची गंगा अंगणात कशी आणि कुठून येणार. कोकणातला काजू- हापूस आंबा ही पिकेही त्याच जातकूळीतील.

नाशीकमध्ये गोदावरीचे पाणी अडवले गेल्याने उत्तर महाराष्ट्रात द्राक्षाच्या बागा फूलल्या. नगदी पैसा मिळाल्याने तिथल्या शेतक-याचे जीवनमान उंचावले. वायनरी उद्योगामुळे या भागातला कास्तकार एकीकडे कुबेर होत असताना विदर्भातला संत्रा उत्पादक मात्र देशोधडीला लागला.
सडवलेल्या द्राक्षाची वाइन सिमेपार गेली मात्र विदर्भातील चांगला संत्रा मात्र साधा राज्याबाहेरही गेला नाही. कारण तेच नाकर्तेपणा...अमरावती आणि नागपूर हा संत्र्याचा बेल्ट. लाखो टन संत्रा दरवर्षी येथे पिकतो. दुर्दैव पहा एवढा संत्रा पिकूनही, एक देखील संत्रा प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यात नाही. तो व्हावा हिच मुळात कोणाची इच्छा नाही. परिणामी पिकलेल्या संत्र्याला भावच मिळत नसल्याने संत्राउत्पादकांनी शेकडो एकरातील बागा मोडल्या. ज्याकाही शिल्लक राहिल्या त्या डिंक्या, बुरशीने फस्त केल्या. उरलेला संत्रा जिथे खायला पूरत नाही, तिथे प्रक्रिया उद्योगाला काय घंटा देणार...? द्राक्षाच्या तोडीस तोड विदर्भाला पैसा देणारी ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी कोण मारली...? कोण शोधणार याचे उत्तर....?

सोयाबिनची देखील तिच गत. महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन विदर्भात पिकते. मात्र खाद्य तेल उद्योग केंद्रित झाले ते गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात. विदर्भात उद्योगच वाढू द्यायचे नाही ही त्यामागची भुमिका.
वास्तविक प.महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ अधिक सुपिक आहे. सिंचनाची सोय नसतानाही हा प्रदेश महाराष्ट्राची भूक भागवत आहे. सिंचनाच्या बाबतीतही तीच बोंबाबोंब. अनूशेष भरून काढतो म्हणायचे आणि वन कायद्याचे फास आवळायचे. मग सिंचन प्रकल्प मार्गी कसे लागणार...
महाराष्ट्राच्या विजेची गरज विदर्भच भागवतो. मात्र त्याला कधीच भारनियमनातून मुक्ती मिळाली नाही. देशातील आघाडीच्या चार सिमेंट कंपन्या याच भागात असताना हक्काचे छत नसलेले कफल्लकही महाराष्ट्रात इथेच जास्त.

प. महाराष्ट्राने लूटले म्हणत किती दिवस रडत बसणार. त्याने तुमचे अपयश झाकले जात नाही, तर त्याची लक्तरे ऊघडी पडतात हे नेत्यांनी ध्यानात ठेवावे. सेना- भाजप युतीच्या चार वर्षासह ज्यांनी या राज्यावर सर्वाधिक सत्ता उपभोगली ते देखील या नाकर्तेपणाच्या पापात वाटेकरी आहेत. कारण योजना राबविण्याची जबाबदारी नुसती सत्ताधा-यांचीच नाही, तर ती विरोधकांची देखील असते.

इथला शेतकरी, सामान्य माणूस कधीही स्वावलंबी झाला नाही पाहीजे हीच सारी तजवीज. ब्रिटिशांचा वारसा लाभलेल्यांनी ती कायम पोसली. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा विदर्भातून लुटायच्या अन हातात कायम कटोरा देऊन दारात ऊभे करायचे हे आणखी किती दिवस सहन करणार....?

मराठवाड्याचे प्रश्न देखील याहून वेगळे नाहीत. ( ते पुढील भागात पाहूयात)

----------
आनंद कस्तुरे....
९८५०२०९७३७

3 comments:

Ravikiran...... said...

anant apratim suru aahe ladha\ keep it up. its incredibal.

Unknown said...

Vidarbha chi honari farpat ani tyvishayichi kalkal aatishay sutsutit asha langauge madhe lihili ahe ,


keep going on brother ....

hrishikesh said...

Anand Kasture is borne reporter. I am his child hood friend but started knowing him by his blog. Apratim likhaan ahe anand. Tujhya jadan khadan honyat vidharbhacha khoop motha wata ahe. In justice is definatly done by any government on vidharbha as well as Marathwada & we should not forget about Khandesh...Great going...