Wednesday, 27 January 2010

सरणावरची राख कधी दिसणार....

लढाई विदर्भाच्या अस्मितेची...
भाग २

जी भाषा जगण्याशी निगडीत प्रश्नांना हात घालते आणि ते प्रश्न सोडवण्यास हातभार लावते तीच भाषा­­ सामान्यांचा आवाज बुलंद करत असते. त्यामुळेच वेगळा विदर्भ या प्रश्नाकडे नुसत्या भाषेच्या चष्मातून पहाता येणारच नाही. त्याला रोजच्या जगण्याशी निगडीत असलेले विविध कंगोरे आहेत.
हा प्रश्न समजून घेत असताना पूर्णतः शेती आणि शेतीशी निगडीत रोजगाराच्या साधनांभोवती फिरणारे विदर्भाचे अर्थकारण आधी समजून घेणे आवश्यक आहे. पिढ्यान पिढ्यान शेतीचेच संस्कार इथल्या समाजमनावर झाले आहेत. पुण्या- मुंबईत बसून महिन्याकाठी ठराविक पगार उचलणा-या नोकरदार वर्गाला त्या संस्काराची किंमत काय कळणार...?

ईतरांच्या अन्नासाठी कर्ज काढून मातीला पैसा लावण्यासाठी जिगर लागते. हिंमत असेल तर परतफेडीची कसलीच शाश्वती नसताना केवळ निसर्गाच्या भरवशावर शेतीत असा पैसा गुंतवून दाखवा... महिन्याला मिळणा-या पगारीला दोन दिवसही उशीर झाला तर ज्यांचे बजेट कोलमडते अशांनी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलू नये, त्यांना तो अधिकारही नाही.

निसर्गाशी नशीबाचा आणि पर्यायाने जगण्याचा सट्टा लावणा-या शेतक-याला दारूड्या, पळपूटा, आळशी म्हणणे सोपे आहे. कारण हात झटकायला ना पैसा लागतो ना जबाबदारीची जाणीव लागते...

कास्तकाराच्या घरात चुली ऐवजी सरण का पेटले हे पाहण्यासाठी ज्या व्यवस्थेला स्वारस्य नसेल, त्या यंत्रणेच्या मागे वैदर्भीयांनी अंधळेपणाने यावे, ही अपेक्षा बाळगणे म्हणजे, निव्वळ निर्लज्जपणाचे लक्षण ठरेल. शेतीची दुरावस्था होत असताना ४० एकराचा मालक ४ एकरावर का आला...?
एकत्र राहण्याचे सल्ले देण्याआधी याचे उत्तर शोधण्याची गरज आहे.

राहीला प्रश्न भाषेच्या अस्मितेचा. विदर्भाची मातीशी आणि खेड्यांशी असलेली नाळ अद्याप तुटलेली नसल्याने भाषेच्या अस्मितेबाबत विदर्भ पुण्या- मुंबईपेक्षा कैक पटीने कट्टरही आहे आणि आग्रही देखील आहे. कारण इथली ७० टक्के जनता आजही खेड्या पाड्यांत रहाते. मराठी हीच त्याच्या जगण्याचे साधन आहे आणि मरणाचे कफनही आहे. भाषेची इतकी कट्टरता आहे का शहरातल्या मराठी माणसांत...?
मराठी माणसाचे खरेच कल्याण करायचे असेल तर विदर्भाच्या खेड्या - पाड्यांत राहणा-या कास्तकाराच्या घरात डोकावून पहा जरा काय दशा आहे त्याची....? नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे गळफास घेणारा कास्तकार हा ना युपी वाला भैया आहे, ना बिहारी बनिया. व्यवस्थेपायी मरणाच्या दारात लोटला गेलेला माणूस हा मराठीच आहे ना....पण दुर्दैवाने आज त्याच्या ना जगण्याला अर्थ आहे ना मरणाला किंमत. मात्र खेड्यातील मराठी माणूस असा बेमौत मरत असताना त्याच्यावर बोलायची कोणालाही गरज वाटत नसेल तर त्या एकत्र नांदायला काडिचीही किंमत नाही...

त्यामुळेच मराठी माणूस हा निव्वळ राजकारणाचा उथळ विषय आहे. त्यात काहीही दम नाही. मुंबई- पुण्यातल्या मुठभर मराठी माणसांच्या रोजगारावर गदा आली की अख्ख्या मराठी माणसाच्या अस्तित्वावर गदा आल्यासारखी ओरड करणा-यांना विदर्भातल्या मराठी माणसाच्या सरणावरची ही राख दिसत नसेल, तर का म्हणून त्या विदर्भाने उर्वरीत महाराष्ट्राच्या दावणीला बांधले जायचे....?
वेगळे होण्याइतपत आलेल्या या परिस्थिती मागचा मराठी माणसाचा हा टाहो कोणालाच ऐकू येत नसेल, तर नाही पाहिजे ती पोकळ एकजूटता आणि नाही पाहिजे ते असे मतलबी एकत्र राहणे.
-------
(विदर्भातील नेत्यांचा करंटेपणा पूढच्या भागात पाहू...)
---------
आनंद कस्तुरे
दि- २७ जाने २०१०
९८५०२०९७३७

1 comment:

Unknown said...

sir very nice blog.