Thursday, 21 January 2010

आता आर या पार...

लढाई विदर्भाच्या अस्मितेची...
भाग १

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दावरून सध्या राज्यात राजकीय कोलाहल माजला आहे. त्यामुळे संयूक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारे तेवढे शहाणे आणि बाकी सारे नालायक हा तथाकथीत युक्तीवाद हा चोरांच्या ऊलट्या बोंबा, असाच प्रकार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या गोंडस नावाखाली साठ वर्ष ईथला मलिदा लाटायचा आणि वरतून वेगळे होऊन प्रश्न सुटणार नाहीत, अशा बोंबा ठोकायच्या, यासारखा शुध्द ढोंगीपणा शोधुनही सापडणार नाही.

उठ सूठ कोणिही यावे आणि विदर्भाला शिव्या-शाप देऊन मोकळे व्हावे, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. असे केल्याने आपण मुंबई- पुण्याच्या डबक्यात शहाणे ठरतो, असा काहींचा समज झालेला असावा. कारण या खेरीज महाराष्ट्रातल्या ईतरही भागात माणूस आहे, हे त्यांना माहितच नाही. वेगळे राज्य मागून जसे काय विदर्भाने अक्षम्य अपराध केल्यासारखी परीस्थिती निर्माण करणे ही तमाम वैदर्भियांच्या प्रती आजवर पोसलेल्या द्बेषाचीच पावती आहे. नव्हे तर ती एक सज्जड पुरावाच आहे.

विदर्भ गोरा की काळा हे ज्यांनी आयुष्यात कधी पाहीले देखील नाही, त्यांनी या तथाकथीत संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या सुरात सूर मिसळून विदर्भाला एकसंघतेची भाषा शिकवू नये. वास्तविक या प्रश्नावरून सामान्य वैदर्भीय माणसाच्या मनातही कोलाहल माजला आहे. सातत्याने होणारा अन्याय, दुर्लक्ष, त्यामुळे वाढत जाणारा अनुशेष आणि परिणामी थांबलेला विकास, सोबतच दरवेळेला या मुद्द्यांवरून नेत्यांचा खोटारडेपणा यासर्व बाबींमुळे आता वैदर्भीयांची घुसमट होत आहे. मग तो सिंचनाचा अनुशेष, नक्षलवादाची धग असो की शेतीची दुरावस्था, त्यातून वाढणारी नापीकी, या असह्यतेतून झालेल्या आत्महत्या असोत. ती सोडविण्यात आलेल्या अपयशातच हा प्रश्न दडलेला आहे.

मराठी अस्मिता आणि मराठी भाषिकांचे राज्य हा कांगावा करीत शिवसेना आणि तिचेच अपत्य असलेल्या मनसेने महाराष्ट्राच्या कल्याणाचा ठेका मिळाल्याचा आव आणला आहे. वास्तविक मनसेची निर्मीती देखील अशाच घुसमटीतून झाली आहे, याचा विसर बहुधा राज ठाकरे यांना पडलेला असावा.
विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचे सांगून याच राज ठाकरे यांनी शिवसेनेशी नाळ तोडून स्वतंत्र संसार थाटला. वेगळे होणे हा पर्य़ाय नाही, हा राज ठाकरे यांचा युक्तीवाद त्यावेळी कुठ्ला चारा खायला गेला होता.
मराठी अस्मीता, मराठी माणूस, एकसंघतेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करायची, त्यावरुन संपूर्ण राज्याला वेठीस धरायचे आणि दूसरीकडे आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवायची, हे न समजण्या ईतकी वैदर्भीय जनता दूधखूळी नाही. तशा गैरसमजातही त्यांनी राहू नये. भाषेच्या पांचट - पुचकट मुद्यावरून मतांची झोळी भरणारी मुंबई - पुण्यासारखी विदर्भाची जनता कमजोर नाही.

मुळात विदर्भाला तथाकथीत पुणेरी मराठी भाषेशी काहिही घेणे देणे नाही. तिचा लेहजा हा बोली भाषेसोबत हिंदी भाषेषी साधर्म्य सांगणारा आहे. तो बाज वैदर्भीयांच्या नसानसांत भिनला आहे. मराठी भाषेबाबत जितकी कट्टरता वैदर्भीयांमध्ये आहे, तितकी ती शोधूनही इतरत्र सापडणार नाही. राहिला प्रश्न अस्मितेचा त्याचा दाखला घेण्यासाठी वैदर्भीयांना कोण्या परक्याची गरज नाही. कारण इतरांच्या ताटाकडे पहात जगणे ही विदर्भाची संस्कृती नाही.

आनंद कस्तुरे
दि- २१ जाने २०१०
९८५०२०९७३७

3 comments:

धनंजय कुलकर्णी said...

intrested

Onkar Danke said...

वेगळ्या विदर्भाची गरज आहे यात शंकाच नाही. माझाही वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे. पण हा विदर्भ वेगळा का हवा हे मुद्दयांवर पटवून देता यायला हवे. असे अनेक मुद्दे आहेत ही. लेखकाने केवळ भावनिक आवाहनच जास्त केलंय..असो या ब्ल़ॉगच्या दुस-या भागात आणखी नवे मुद्दे येतील अशी अपेक्षा आहे.

Anonymous said...

Great. You are good in writing, information and presentation.
Keep it up/

Ashish Chandorkar