राजकारणाच्या पोटात वाद असतो , असे म्हटले जाते. कदाचित या उक्तीची साक्ष पटावी या साठीच राजकारणी रोज नवनव्या वादांना जन्म घालत आहेत. गेल्या दोन महिन्यांमधील कोणतेही दैनिक उघडून पाहा. या वादांनी खचाखच भरलेले रकानेच्या रकाने पाहायला मिळतील. त्यात हा वाद भ्रष्टाचाराशी निगडीत असेल तर काही सांगायलाच नको.
मुळात सरकारची तिजोरी ही जनतेची असते आणि जनतेने ती लुटण्यासाठीच आपल्याला मतदान घेऊन निवडून दिले आहे आणि नेतेपदाचे लायसनही दिले आहे, असा समज करून बसलेले नेते धनावर बसलेले कालीया नाग झाले आहेत. थेटच सांगायचे झाले तर राजकारण म्हणजे आता खादी अंगावर चढविलेल्या दरोडेखोरांचा अड्डाच झाला आहे, याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर येत असलेल्या भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणांवरून येईल.
राष्ट्रकूल स्पर्धेच्या आयोजनात सुरेश कलमाडींनी ४ हजार कोटींचा गैरव्यवहार केला. कलमाडींची लफडी समोर येण्यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हटवादीपणामुळे हजारो कोटींचे अन्नधान्य गोदामांअभावी मातीत गेले. या दोन प्रकरणांचा धुराळा शांत होत नाही तोच आयपीएलमधील नेत्यांची लफडी चव्हाट्यावर आली. सगळ्या गोष्टी पैसा फेकून मॅनेज होत आहेत, असे दिसत असतानाच मुंबईतील आदर्श हाऊसिंग सोसायटीचा घोटाळा उघडकीस आला. महाराष्ट्रात तर त्यावरून अनेकांना घरचा रस्ताही दाखवला गेला. स्पेक्ट्रम घोटाळा तर या सर्वांचा बाप निघाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले, मग मीच काय घोडे मारले या अविर्भावातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही हात धुवून घेतले. ही सारी प्रकरणे कमी होती की काय म्हणून १ हजार कोटींचा होम लोन आणि ४५० कोटींच्या गोल्ड एक्स्पोर्ट घोटाळ्याने तोंड वर काढले. अवैध मार्गांनी पैसा जमा करणारे झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा याच जातकुळीतील.
गेल्या काही महिन्यांत चव्हाट्यावर आलेल्या नेत्यांच्या घोटाळ्यांची गोळाबेरीज केली तर ही रक्कम ८ ते ९ हजार कोटींच्या घरात गेली आहे. बर ही समोर आलेली ऑन रेकॉर्ड प्रकरणे आहेत. असे कित्येक घोटाळे -लफडे; नेते, राजकारणी आणि नोकरशहांनी पचविली आहेत. इंग्रजांनी १५० वर्षे राज्य करूनही जेवढी रक्कम लुटली नव्हती तेवढी या खादाड राजकारण्यांनी गेल्या काही महिन्यांत ओरबाडली आहे. या खादाड वृत्तीने अख्या व्यवस्थेला भगदाड पाडले आहे.
हा राष्ट्रद्रोह नाही का....?
बंडखोर लेखिका अरूंधती रॉयने काश्मीर भारताचा अविभाज्य घटक नसल्याचे सांगत नक्षल्यांना खर्या देशभक्तीचे प्रमाणपत्र दिले. या दोन्ही वादग्रस्त विधानांची ताजी प्रकरणेही देशात चांगलीच गाजत आहेत. अरूंधती नक्षल्यांच्या हिंसाचाराचे समर्थन करते ,म्हणून तिला अनेकांनी वाचाळ उपाधी देत आधीच पिंजर्यात उभे केले आहे. त्यात आता तिने काश्मीरसारख्या नाजूक आणि अवघड जागच्या दुखण्याला हात घातल्याने सरकारचीही गोची झाली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याने तिच्यावर आता राष्ट्रद्रोहाचा खटलाही दाखल झाला आहे. अरूंधतीचा अपराध राष्ट्रद्रोह आहे, की नाही, हा वादाचा स्वतंत्र विषय आहे. तो नंतर पाहू. पण मुळात या पेक्षाही मोठा राष्ट्रद्रोह करीत व्यवस्थेत घुसलेल्या घोटाळेबाज नक्षल्यांचे काय करायचे ? मग त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा खटला कधी दाखल होणार? हा खरा प्रश्न आहे.
अरूंधतीसारख्या आणखी ५- १० जणांनी घोटाळेबाज राजा, कलमाडींची पाठराखण केली असती तर नि:ष्कलंकतेचे जणू प्रमाणपत्रच मिळाल्यासारखा देखावा निर्माण करण्यातही या नेत्यांनी मागे पुढे पाहिले नसते. म्हणजे भरडलेल्यांचा आवाज व्हाल तर राष्ट्रद्रोह ; आमची साथ द्याल तर देशभक्त... असाच त्यातून अर्थ घ्यायचा का....?
अरूंधतीने माओवाद्यांच्या समर्थनार्थ केलेले हे पहिले विधान तर नाहीच नाही. या पूर्वीही तिने उघडपणे आणि छाती ठोकून माओवाद्यांची पाठराखण केली आहे. तिच्या बोलण्यात जितकी दाहकता आहे, तितकीच व्यवस्थेत भरडल्या गेलेल्या लोकांविषयी आत्मियतादेखील आहे. त्यामुळेच थेट छाताडावर वार करणारी अरूंधती पाठीत खंजीर खुपसणार्यांपेक्षा केंव्हाही परवडणारी आहे. कारण छाताडावर झालेला वार हा कदाचित वर्माचा घात करू शकतो, पण पाठीत खुपसलेला खंजीर हा कायम विश्वासाचा घात करतो. माओवाद्यांच्या हिंसेतून कृती बाजूला काढली तर या लोकांना हातात शस्त्र घेण्याची वेळ कोण आणली याचा सरकार कधी विचार करणार आहे का...? तसे जर होणार नसेल तर या देशात अरूंधतीसारख्यांची फौज निर्माण व्यायला वेळ लागणार नाही. बंदूकीचा पहारा बसविलेल्या काश्मीरने त्याची ठिणगी टाकली आहे... उद्या त्याचा भडका व्हायला वेळ लागणार नाही....
-------------
आनंद कस्तुरे
२८ ऑक्टोबर २०१०
९८५०२०९७३७....
ask247@gmail.com
