Sunday, 28 March 2010

संवेदनशीलता गमावलेली लाळघोटी पत्रकारिता....!

 समाजामधील संवेदनशीलता हरविलेल्या घटना आपण नेहमी पाहतो अनुभवतो. राजकीय पुढा-यांभोवती पिंगा घालणारे लाळघोटे कार्यकर्ते देखील नवे नाहीत. माध्यमांच्या क्षेत्रात काम करणा-यांना अशी उदाहरणे रोज पहायला मिळतात. पण ज्याच्या खांद्यावर हे रोखण्याची धुरा आहे, त्याच माध्यमांमधील तथाकथीत पत्रकारच जर असा लाळघोटेपणा करत असतील आणि हे पाहून तळपायाची मस्तकात जात नसेल तर "दुकानदारी " वर जगणा-या पत्रकारांच सुगीचे दिवस आले आहेत हे समजून घ्यावे.
वरकरणी पाहता ही घटना अतिशय साधी वाटणारी आहे. पण खोलात जावून विचार केला तर पत्रकारितेसमोरील अनेक प्रश्न उभे करणारी आहे, आणि सोबतच या क्षेत्रातील नंगेपणा ठसठशीतपणे अधोरेखित करणारी आहे.
रविवार दि. २८ मार्च हा रोजच्या प्रमाणे उगवलेल्या अगणिक दिवसांपैकी एक दिवस.... पण या
दिवसाने अनेकांच्या काळजावर कायमचे ओरखडे ओढले....हा दिवस अनेकाजण शेवट्च्या श्वासापर्यंत विसरणार नाहीत. एकीकडे सूर्य नवा दिवस, नवी उमेद, नवी आशा, नवी स्वप्ने घेऊन येत असताना अहमदपूर तालूक्यातील आठ घरांमध्ये मात्र कायमचा अंधार दाटला.

अहमदपूर तालूक्यातील हगदळ या गावातील ९ जण देवदर्शनासाठी चंद्रपूरकडे निघाले. देवाच्या पायावर डोके ठेवायाला निघालेले थेट देवाच्या दारातच पोचले.

एका अनपेक्षीत वळणावर त्यांची वाट चुकली. मात्र याच वाटेवर जणू मृत्यू त्यांची वाट पहात उभा होता. उद्याचे सूर्य दर्शन आपल्या नशीबात नाही....याची पुसटशीही कल्पना या ८ जिवांना नसेल. ती असणार तरी कशी...दबा धरून बसेलेल्या मृत्यूने एका क्षणात त्यांच्यावर झडप घातली....ही घटना घडण्यापुर्वी भोळ्या श्रद्धे पायी आपण मृत्यूच्या दिशेने निघालो आहोत हे त्यांना साक्षात यमाने जरी सांगितले असते तरी पटले नसते....
ही झाली घटना.....
पत्रकारीतेत तीला सर्वांत मोठी न्यूज व्हैल्यू.....
त्यामूळे या घटनेशी संबंधी माणूसपणाशी निगडीत सर्व गोष्टी अधोरेखीत व्हायला हव्या होत्या... दुर्दैवानी तसे झाले नाही....

ऐकीकडे एक क्षणात अनेकांच्या आयुष्यात कायमचा अंधार दाटलेला असताना देशाच्या राजकारणातील लातूर जिल्ह्यातील शिवराज पाटील चाकूरकर हा बडा नेता जाहिर सत्कार घेत होता....जगाच्या कक्षा ओलांडून या नेत्याने कोणता पराक्रम केला आहे, माहीत नाही....तो इथे विषय देखील नाही...
व्यक्ती पुजेला चटावलेल्या राजकारणाच्या गटारात दगड मारण्याची माझी अजिबात ईच्छा नाही. पण या नेत्याचा कार्यक्रम ऐकण्यासाठी एका पत्रकाराने कर्तव्याला लाथाडले.
विशेष म्हणजे ज्या तालूक्यातील लोकांवर हा प्रसंग गुदरला त्याच तालुक्यात हा पत्रकार काम करतो..... सामान्य माणसाच्या दु:खा पेक्षा त्याला नेत्याचा सत्कार मोलाचा वाटला....
डोळे, मेंदू ऊघडा असेल तर पहा कुठे चालली आहे पत्रकारिता....
अशा लोकांसाठी पत्रकारिता हा ध्यास नाही तर दुकानदारीचे माध्यम आहे. आणि तेच आज प्रतिष्टेचे आहे. पत्रकारितेच्या नावाखाली नेत्यांचा असा लाळघोटेपणा करताना या माणसांना जरादेखील लाज वाटत नाही. ज्याच्यामध्ये संवेदनशीलता उरलेली नाही, त्याला या क्षेत्रात राहण्याचा तिळमात्रही अधिकार नाही.

हे फक्त एकच उदाहरण आहे. जाहिरातींच्या कमिशनखाली दबलेली अशी कित्येक माणसे या नेत्यांनी पोसली आहेत. स्वत:ला लोकशाहीचा स्तंभ म्हणवून घेणारा आता नेत्यांचा गुलाम आहे.....संघटीत झालेल्या या गुलामांची स्वतंत्र टोळी आहे.

काळ कोणासाठी थांबत नाही.
थांबणारही नाही.... तो चालत राहणार आहे... कारण

पुढे सरकणे हा निसर्गाचा नियम आहे....
अशा घटना या पुर्वीही घडल्या आहेत. पुढेही घडत राहणार आहेत. हा काळ आहे. आजचा वर्तमान उद्या भूत होणार आहे. त्यातच उद्याचे भविष्य देखील आहे.

पण आपण कशासाठी आहोत ही संवदना ज्याच्यात नाही, त्याच्यातला रावण अजरामर आहे.....नुसता राम राम घालून जीवनात राम दिसत नसतो... तर तो अशा घटनांमधून शोधावा लागतो.
मस्तवालपणे जगण्याच्या नादात आपण रोज नवी स्वप्ने पहात असतो... येणा-या कित्येक दिवसांवर आपला हक्क सांगतो.... स्वप्ने रंगविणे वाईट नाही...ती रंगविलीच पाहीजेत... कारण ती तुमच्या जिवंतपणाचे लक्षण आहे....स्वप्नांविना जग हे प्रत्येक श्वासात मृत्यूला पाहण्याचे लक्षण आहे...

मृत्यू हा अनूभवायचा असतो, तो जगायचा नसतो...
दोन श्वासांमध्ये जीतके अंतर असते तेवढेच माणसाचे जीवन असते. तिथेच जगणे शोधायचे असते....
जगण्याच्या वाट्याला आलेली १०० वर्षे लाळघोटायची की एक एक क्षण स्वाभिमानाने जगायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
..................................
आनंद कस्तूरे
दि. २८ मार्च २०१०
9850209737